स्थानिक पर्यटन व्यावसायिकांवर अन्याय झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार; देवबाग, तारकर्ली, वेंगुर्ला, निवतीसह मालवणच्या व्यावसायिकांना संरक्षणाची मागणी
वेंगुर्ले, दि. ८ : प्रतिनिधी :
वेंगुर्ले तालुक्यातील निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत असून, निवतीतील जलसफरीवर बंदी घालून हा पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असेल, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला.
वेंगुर्ले परिसरातील पर्यटनस्थळे स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांनी गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून पर्यटकांच्या नकाशावर आणली आहेत. स्थानिकांच्या सहभागामुळेच या भागातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. मात्र, आता अत्याधुनिक बोट प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांचा पारंपरिक पर्यटन व्यवसाय काढून घेऊन तो मोठ्या व्यावसायिकांच्या हातात देण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ठाम विरोध राहील, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
निवती लाईट हाऊस परिसरात स्थानिक पर्यटन व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांना जलसफर घडवून आणत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेत हा व्यवसाय सुरू असताना केवळ नियमांचा आधार घेत जलसफर बंद करण्याऐवजी स्थानिक व्यावसायिकांनाच विश्वासात घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. नियमांची पूर्तता करून स्थानिकांच्या माध्यमातूनच जलसफर सुरू ठेवण्यासाठी शासन आणि प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी नाईक यांनी केली.
पर्यटन विकासाच्या नावाखाली स्थानिकांचा रोजगार हिरावून घेणे योग्य नाही. सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय उभा करण्यात स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विकास प्रकल्प राबविताना त्यांचे हित आणि रोजगार सुरक्षित ठेवणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
देवबाग, तारकर्ली, वेंगुर्ला-निवती आणि मालवण परिसरातील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांवर अन्याय करून पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या हाती देण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वस्थ बसणार नाही. स्थानिकांच्या रोजगारासाठी आणि त्यांच्या हक्काच्या पर्यटन व्यवसायासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.






