मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीज् संचलित भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. १९ व २० डिसेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे उत्साहात संपन्न होणार आहे.
दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक सतीश लळीत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सहखजिनदार अभिमन्यू कवठणकर असतील. तसेच संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या वेळी मान्यवरांचा सत्कार, बेस्ट स्टुडंट पुरस्कार, कनिष्ठ महाविद्यालय आदर्श विद्यार्थी पुरस्कार तसेच स्व. टेमकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांची मार्गदर्शक भाषणे होणार असून दुपारी १२ वाजता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे तर दुपारी २.३० वाजता प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमास पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईच्या कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट, स्थानिक कमिटी तसेच मुख्याध्यापक हणमंत तिवले यांनी केले आहे.





