कुडाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कट्टा येथील वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात दुर्वा राणे हिने तृतीय क्रमांक, तर गंगूताई पाटील हिने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीच्या जोरावर दोघींचीही कुडाळ येथे मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे
या यशासाठी दुर्वा राणे व गंगूताई पाटील यांना प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख संदीप गोळवणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर व शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिकांनी विद्यार्थिनींना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





