मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट महादेवा’ या महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे, ग्रामीण व शहरी भागातील क्रीडाप्रतिभांना संधी देणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
‘प्रोजेक्ट महादेवा’ हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) तसेच महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

या शुभारंभ कार्यक्रमास जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी, अर्जेंटिनाचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ व रॉड्रिगो डिपॉल यांची उपस्थिती लाभली. याशिवाय क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलमधील लोकप्रिय खेळाडू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तसेच MITRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, सौ. अमृता देवेंद्र फडणवीस, गोट टूर प्रमोटर सत्तादूर दत्ता, बॉलिवूडमधील टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनो मोरिया, उद्योग क्षेत्रातील पार्थ जिंदल, वेदना जिंदल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘प्रोजेक्ट महादेवा’मुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल. युवकांच्या ऊर्जेला योग्य व्यासपीठ मिळून राज्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.





