मालवण | प्रतिनिधी
मालवणमधील प्रसिद्ध ब्युटी पार्लर व्यवसायिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सलील मांजरेकर यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियान यांच्या वतीने मुंबई येथे आयोजित समारंभात ‘कोकण रत्न’ पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ. सायली मांजरेकर या गेली अनेक वर्षे मालवण येथे ब्युटीशियन म्हणून कार्यरत असून सायली ब्युटी पार्लरच्या माध्यमातून त्या शासनमान्य ब्युटीशियन कोर्सचे प्रशिक्षण देत आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक युवती व महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने सक्षम केले आहे. यासोबतच त्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून समाजहितासाठी योगदान देत आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकणराज्य अभियान यांच्या वतीने त्यांची ‘कोकण रत्न’ पदवी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. शनिवारी मुंबई मराठी पत्रकार भवन, मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार-संपादक सचिन कळझूनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे, सल्लागार दिलीप लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सन्मानामुळे मालवणसह संपूर्ण कोकणातील महिला उद्योजकांसाठी सौ. सायली मांजरेकर प्रेरणास्थान ठरत आहेत.





