राजकारणात पद मिळणं ही केवळ संघटनात्मक प्रक्रिया नसते; तर ती पक्ष नेतृत्वाने एखाद्या कार्यकर्त्यावर टाकलेला विश्वास असतो. सातत्याने जनसंपर्क, लोकप्रतिनिधी म्हणून केलेलं काम आणि महिलांमध्ये निर्माण केलेला विश्वास याचीच पावती म्हणजे शिवसेना महिला सेनेच्या मालवण-कुडाळ तालुका प्रभारीपदी झालेली सौ. पूनम नागेश चव्हाण यांची नियुक्ती.
मालवण नगरपरिषदेच्या नगरसेविका आणि आरोग्य सभापती म्हणून कार्य करताना पूनम चव्हाण यांनी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या नाहीत, तर नागरिकांशी सातत्याने संवाद साधत लोकाभिमुख कामांची छाप उमटवली. विशेषतः महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका आणि समाजाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर मालवण-कुडाळ तालुक्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही नियुक्ती केवळ पदाची नसून, महिला संघटना अधिक सक्षम करण्याची, गावागावांत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याची आणि तळागाळातील महिलांना संघटित करण्याची मोठी जबाबदारी आहे.
शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, चित्रा हरमळकर, विद्या फर्नांडिस, मधुरा तुळसकर, रश्मी तुळसकर, नंदिनी हडकर, अक्षता गावडे यांच्यासह महिला सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती या नियुक्तीबद्दलचा उत्साह दर्शवणारी होती.
नियुक्तीनंतर पूनम चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत महिला सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि प्रत्येक गावातील महिलांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आजच्या राजकारणात महिला नेतृत्व अधिक सक्षम होण्याची गरज सातत्याने व्यक्त होत आहे. अशा काळात तळागाळातून काम करणाऱ्या कार्यकर्तीला महत्त्वाची जबाबदारी मिळणं ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून, नव्या महिला नेतृत्वाला मिळालेली प्रेरणाही आहे.
मालवण आणि कुडाळ तालुक्यातील महिला संघटनेला नवसंजीवनी देत, संघटन अधिक बळकट करण्याच्या दिशेने पूनम चव्हाण यांची ही नवी वाटचाल निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे. पद हा सन्मान असतो; मात्र त्या पदाला कामातून अर्थ प्राप्त करून देणं हीच खरी नेतृत्वाची ओळख असते. त्या कसोटीवरही त्या यशस्वी ठरतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.







