अंतिम फेरीसाठी मुंबई विद्यापीठाकडून निवड; ५९व्या युवा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी
मालवण, दि. प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५९व्या युवा महोत्सवात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची संभाजी परब हिने कथाकथन (मराठी) या कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यंदाच्या महोत्सवातही विविध कला, साहित्य आणि सांस्कृतिक प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली गुणवत्तापूर्ण कामगिरी सादर केली.
कथाकथन (मराठी) या कला प्रकारात प्राची परब हिने आपल्या प्रभावी आवाजातील चढ-उतार, आशयपूर्ण मांडणी, अभिनय आणि सादरीकरणातील आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षकांची दाद मिळवली. तिने मिळविलेल्या द्वितीय क्रमांकामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्राची परब हिला या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रा. व्ही. आर. पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीने कथाकथनाची प्रभावी तयारी केली.
प्राची परब हिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. व्ही. मिराशी, उपप्राचार्य श्री. आर. जी. गावडे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या प्राची परब हिला पुढील स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या असून, अंतिम फेरीतही ती उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.






