मालवण | प्रतिनिधी
लायन्स क्लबच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लायन्स क्लब मालवणच्या माजी अध्यक्षा लायन अनुष्का अवधूत चव्हाण यांची लायन्स क्लबच्या झोन चेअरपर्सन पदावर निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मालवण लायन्स क्लबमधून झोन चेअरपर्सनपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या असून, त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनुष्का चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली क्लबने तब्बल १०३ सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. या कार्याची दखल घेत झोन, रिजन आणि डिस्ट्रिक्ट स्तरावर वैयक्तिक तसेच क्लबला मिळून सुमारे २० पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात दंत व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन, आचरा-वायंगणी येथे बस पिक-शेडसारखा कायमस्वरूपी प्रकल्प, मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी बेंच व खुर्च्यांचे वाटप, तसेच सिंधुदुर्गातील विविध अनाथाश्रमांमध्ये अन्नदानाचे उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून, कुडाळकर हायस्कूलमधील एका गरजू विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून सामाजिक बांधिलकीचे वेगळे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लायन्स डिस्ट्रिक्टने २०२६-२७ या वर्षासाठी त्यांची झोन चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. या पदाच्या माध्यमातून त्या मालवण, कुडाळ, सावंतवाडी, सावंतवाडी रॉयल आणि कणकवली येथील लायन्स क्लबच्या कामकाजाचे नेतृत्व करणार आहेत.
या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना अनुष्का चव्हाण यांनी या यशाचे श्रेय लायन्स परिवार, क्लबमधील सहकाऱ्यांचे सहकार्य, कुटुंबीय आणि विशेषतः पतीने दिलेल्या पाठबळाला दिले. त्यांच्या निवडीमुळे मालवण लायन्स क्लबच्या इतिहासात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.







