कट्टा | प्रतिनिधी
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘समृद्धी’ कार्यक्रम (सन २०२५–२६) अंतर्गत कला एकात्मिक अध्यापनशास्त्र स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे येथे नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील सौ. सिमरन समीर चांदरकर (सहाय्यक शिक्षिका) व श्री. समीर अशोक चांदरकर (कलाशिक्षक) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे दोघांचीही राष्ट्रीय स्तरावरील समृद्धी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
माध्यमिक स्तरावरील ‘समृद्धी’ स्पर्धा ही राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमाचा विस्तारित उपक्रम असून, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२५–२६ मध्ये (दुसरे वर्ष) आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमाशी निगडित कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतींवर आधारित सर्वोत्तम अध्ययन–अध्यापन कृती सादर करण्याची संधी शिक्षकांना मिळते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP–२०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF–२०२३) यांच्या अनुषंगाने कला एकात्मिक पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे व प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या स्पर्धेत सौ. सिमरन व श्री. समीर चांदरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पिंगुळी येथील कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून इयत्ता नववीचा ‘किं मिथ्या? किं वास्तवम्?’ हा पाठ सादर केला. महाराष्ट्रातील विविध विभागांमधून १५ गटांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. तापकीर सर, डॉ. इसावे मॅडम व डॉ. सुवर्णा भुजबळ यांनी केले. बक्षीस वितरण समारंभ श्री. अरुण जाधव (उपसंचालक – सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग, SCERT, पुणे), डॉ. कमलादेवी आवटे (सहसंचालक, SCERT, पुणे), श्री. राहुलजी रेखावार (भा.प्र.से.), संचालक SCERT, महाराष्ट्र, पुणे तसेच कला व शास्त्र विभाग प्रमुख संघप्रिय वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या उल्लेखनीय यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष कर्नल शिवानंद वराडकर, उपाध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, श्री. आनंद वराडकर, श्री. शेखर पेणकर, सचिव श्री. सुनील नाईक, सहसचिव श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार श्री. एस. डी. गावडे, शालेय समिती अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. महेशभाट तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य, शिक्षक व शिक्षिका यांनी सौ. सिमरन व श्री. समीर चांदरकर यांचे अभिनंदन केले आहे






