मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक राहावे यासाठी मालवण नगरपरिषदेकडून नागरिकांना घरगुती कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करूनच कचरा देण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हे आवाहन करण्यात आले असून ओला, सुका, घरगुती घातक व सॅनिटरी कचरा वेगवेगळ्या प्रकारे वेगळा करून नगरपरिषदेकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेकडून दिलेल्या माहितीनुसार, ओल्या कचऱ्यात शिल्लक राहिलेले अन्न, फळ-भाज्यांच्या साली, अंड्याची टरफले, चहाची पत्ती, मांस-हाडे, फुलांचा कचरा, नारळाच्या साली आदींचा समावेश होतो. जो कचरा कुजतो तो ओला कचरा मानला जातो.
सुका कचरा म्हणून प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कागद, धातू, काच, मोडके फर्निचर, कपड्यांच्या चिंध्या, चप्पल, वायर आदींचा समावेश करण्यात आला आहे. जो कचरा कुजत नाही तो सुका कचरा मानला जातो.
तसेच घरगुती घातक कचऱ्यात मुदतबाह्य औषधे, थर्माकोल वस्तू, ई-वेस्ट, रंग, सेल, ब्लेड, फूटलेली काच, किटकनाशके, ट्यूबलाईट, सी.एफ.एल., बॅटऱ्या आदींचा समावेश असून हा कचरा मानव, पशु-पक्षी व पर्यावरणासाठी घातक ठरू शकतो.
सॅनिटरी कचऱ्यात सॅनिटरी पॅड, नॅपकिन व डायपर्स यांचा समावेश असून हा कचरा सुरक्षित आवरणात गुंडाळून नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे वेगळा करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ओला व सुका कचरा एकत्र दिल्यास त्यावर प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात अडचणी निर्माण होतात, दुर्गंधी पसरते तसेच आरोग्याचा धोका वाढतो. प्लास्टिक कचरा नष्ट न झाल्याने नाल्या तुंबतात व डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरते.
“चला संकल्प करूया, मालवण शहराच्या स्वच्छतेसाठी आपणही योगदान देऊया…!” असे आवाहन करत मालवण नगरपरिषदेकडून प्रत्येक नागरिकाने कचरा वर्गीकरणाचे नियम पाळावेत, कचरा रस्त्यावर, नाल्यात किंवा उघड्यावर टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.








