उपाध्यक्षपदी बाळू तारी यांचीही फेरनिवड; दोन्ही निवडी बिनविरोध
मालवण, दि. ७ (प्रतिनिधी) : मालवण मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, मालवणच्या सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी कांचन उर्फ विकी अरुण चोपडेकर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण उर्फ बाळू भगवान तारी यांचीही बिनविरोध फेरनिवड झाली.
या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. संस्थेच्या संचालक मंडळावर तुळशीदास लाडोबा तोडणकर, लक्ष्मण मुरलीधर भगत, कमलाकांत शशिकांत कोचरेकर, स्वप्निल भास्कर आचरेकर, जेम्स रेमेत ब्रिटो, विल्सन एलविन डिसोझा, निलेश बाळकृष्ण कांदळगांवकर, विद्या विनायक मोरजकर आणि सविता संतोष तांडेल यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
संस्थेच्या सचिवपदी सौ. ऋतुजा रघुनाथ मोंडकर कार्यरत आहेत.
अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल विकी चोपडेकर आणि बाळू तारी यांचे संचालक मंडळ तसेच संस्थेच्या सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष विकी चोपडेकर म्हणाले की, या संस्थेचे अध्यक्षपद यापूर्वी श्रीकृष्ण ताम्हणकर, नारायण कवटकर आणि तुळशीदास तोडणकर यांसारख्या जाणकार व्यक्तींनी भूषविले आहे. अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल आपण सहकाऱ्यांचे आभारी असून, हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.
संस्थेच्या माध्यमातून मच्छिमार सभासदांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच मच्छिमारांचे कल्याण आणि त्यांच्या हितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धारही चोपडेकर यांनी व्यक्त केला.






