मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आले आहेत. यात विनया विनायक कसालकर पुरस्कृत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार अ. के. टिकम गुरुजी विद्यामंदिरच्या शिक्षिका सिमंतिनी सुनील सावंत यांना, तर खासगी शिक्षक संघटना पुरस्कृत आदर्श शिक्षिका पुरस्कार मालवण येथील मोहनराव परुळेकर शाळेच्या शिक्षिका नीलिमा शिरीष कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे यंदाचे विसावे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि महावस्त्र असे असून, संघटनेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात दोन्ही शिक्षिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सिमंतिनी सावंत आणि नीलिमा कुलकर्णी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष गणपत चौकेकर, सचिव राजन नार्वेकर, शांताराम जंगले, प्रदीप सावंत आदींनी सिमंतिनी सावंत व नीलिमा कुलकर्णी यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







