TAIT-2025 अंतर्गत पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित निवड प्रक्रिया; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन
मुंबई :
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड होणाऱ्या प्रकारासाठी एकूण १३ हजार ११९ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) अंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात आली. ही प्रक्रिया पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने राबविण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पवित्र पोर्टलवरील लॉगिनवर तसेच एसएमएसद्वारे निवडीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना आपल्या निवडीची माहिती थेट आणि सुलभ पद्धतीने मिळणार आहे.
नव्याने निवड झालेल्या शिक्षकांनी केवळ अध्यापनाची जबाबदारी पार पाडण्यापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योगदान द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांची जडणघडण करण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमुळे शिक्षक पदांसाठी गुणवत्ताधिष्ठित उमेदवारांची निवड करण्यास मदत झाली असून, नव्या शिक्षकांकडून राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







