कृष्णा लोणे द्वितीय; विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरव
मालवण (प्रतिनिधी) :
मालवण दांडी येथे दांडी श्रीकृष्णवाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरुषांच्या नारळ लढविणे स्पर्धेत अमन केळूसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर कृष्णा लोणे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. नारळी पौर्णिमेच्या उत्साहात रंगलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रथम क्रमांकाच्या विजेत्या अमन केळूसकर यांना मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी पुरस्कृत केलेली १५ हजार रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकावणारे कृष्णा लोणे यांना नगरसेवक महेश कोयंडे यांनी पुरस्कृत केलेली १० हजार रुपये रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला.
याशिवाय रोहन आचरेकर आणि हर्षद तलावडेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, स्पर्धेचे आयोजक सचिन तारी, गणेश तारी, काशीराम तारी, प्रसाद धुरी, वसंत धुरी, लीलाधर धुरी, राजू धुरी यांच्यासह नागरिक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला नारळ लढविण्याच्या या स्पर्धेमुळे विशेष रंगत आली. स्पर्धेतील चुरशीच्या लढतींना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.







