मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) तरुण आणि सुशिक्षित पिढीला प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी ‘BMC Gen Z Fellowship Program’ जाहीर केला आहे. या १२ महिन्यांच्या फेलोशिप कार्यक्रमात निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६१ हजार ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी एकूण ५० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.
‘विकसित मुंबई’च्या संकल्पनेत तरुणांचा सक्रिय सहभाग वाढवणे, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा महापालिकेच्या कामकाजात उपयोग करून घेणे आणि त्यांच्यात प्रशासकीय नेतृत्वगुण विकसित करणे हा या फेलोशिपचा उद्देश आहे. निवड झालेल्या फेलोंना महापालिकेतील प्रशासकीय कामकाज समजून घेण्यासोबतच धोरणकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
कोण अर्ज करू शकते?
या फेलोशिपसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय २८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. यासोबतच हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. संगणक हाताळणी तसेच इंटरनेटच्या वापराचे ज्ञानही उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
१२ महिन्यांची फेलोशिप
निवड झालेल्या उमेदवारांचा फेलोशिप कालावधी १२ महिने असेल. या काळात त्यांना महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून विविध विकासकामे, धोरणनिर्मिती आणि प्रशासनाशी संबंधित प्रक्रियांमध्ये सहभागी होता येणार आहे. फेलोशिप यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महापालिकेकडून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
३१ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी
या फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
मुंबईच्या प्रशासनाचा जवळून अनुभव घेण्यासोबतच आपल्या कल्पना आणि कौशल्यांचा शहराच्या विकासासाठी उपयोग करण्याची संधी या फेलोशिपमधून तरुणांना मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








