मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून ‘खड्डेमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांची सद्यस्थिती, गणेशमूर्ती विसर्जन मार्ग, मिरवणुकीचे प्रमुख मार्ग तसेच विसर्जन घाटांवरील सुविधांचा आढावा घेण्यात आला. विसर्जन मार्गांवर एकही खड्डा राहू नये, यासाठी महापालिकांनी तातडीने आणि कालबद्ध पद्धतीने काम सुरू करावे, असे निर्देश शिंदे यांनी दिले.
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबत प्री-कास्ट आणि जिओ-पॉलिमर टेक्नो पॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डेही तातडीने बुजवण्याचे आदेश देण्यात आले.
नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार नोंदवता यावी यासाठी फोन नंबर जाहीर करावेत, तसेच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. रस्ते दुरुस्तीसाठी २४ तास कार्यरत यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महापालिकांमध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची नियमित पाहणी करावी. आवश्यकता भासल्यास महापालिका आयुक्तांनी कार्यालयात न थांबता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कामांचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
“गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा आणि अभिमानाचा सण आहे. विघ्नहर्त्याचे आगमन आणि विसर्जन सुरळीत पार पडावे, यासाठी रस्त्यांवरील खड्डे हे कोणतेही विघ्न ठरता कामा नये. त्यासाठी सर्व यंत्रणांनी एकदिलाने काम करावे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.







