मालवण : घुमडे-मालवण येथील देवी घुमडाई मंदिरात श्रावण महिन्याचे औचित्य साधून यंदाही ‘श्रावणधारा’ या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगावकर बुवा यांच्या स्मरणार्थ आयोजित या महोत्सवात विविध धार्मिक विधी, लघुरुद्र, महाप्रसाद, निमंत्रित बुवांची भजनसेवा आणि नामवंत दशावतारी नाट्यमंडळांचे प्रयोग अशा कार्यक्रमांची मेजवानी भाविक व रसिकांना मिळणार आहे.
आज, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम व लघुरुद्र, दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘किमिच्छक व्रत’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
त्यानंतर २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता निमंत्रित बुवांची भजनसेवा आयोजित करण्यात आली आहे.
२५ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा ‘दुर्गाषष्ठी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. २७ ऑगस्ट रोजी निमंत्रित बुवांची भजनसेवा होईल.
१ सप्टेंबर रोजी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, मालवण यांचा देवेंद्र नाईक प्रस्तुत ‘कृष्ण !! ब्रह्मांडाचा धनी’ हा नाट्यप्रयोग रंगणार आहे. याच दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचा अंतिम कार्यक्रम ८ सप्टेंबर रोजी होणार असून, हेरंब दशावतार नाट्य मंडळ, मालवण यांचा पप्पू नांदेसकर प्रस्तुत ‘इंद्रजित वध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
या धार्मिक-सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ भाविक आणि दशावतारी नाट्यरसिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






