हिंगोलीतून अभियानाला सुरुवात; पालकांकडून शाळांचे ‘सोशल ऑडिट’, प्रशासनाला दुरुस्तीची डेडलाइन देणार
मुंबई: ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव आणि दुरवस्थेविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी १५ ऑगस्ट २०२६, स्वातंत्र्यदिनापासून ‘स्कूल ठीक करो’ (Shaala Theek Karo) या देशव्यापी जनआंदोलनाची सुरुवात केली आहे. देशात आधुनिक पायाभूत सुविधा आणि नवीन संसद भवन उभे राहत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह आणि सुरक्षित वर्गखोल्यांसारख्या प्राथमिक सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा मुद्दा या अभियानातून उपस्थित करण्यात आला आहे.
या अभियानाची अधिकृत सुरुवात अभिजीत दिपके यांच्या मूळ गावातून, हिंगोली जिल्ह्यात करण्यात आली. देशभरातील CJP कार्यकर्त्यांनी आपल्या मूळ गावी जाऊन स्थानिक सरकारी शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून शाळांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालकांकडून शाळांचे ‘सोशल ऑडिट’
‘स्कूल ठीक करो’ अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ आंदोलन किंवा घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष पाहणी आणि पुरावे संकलित करण्यावर देण्यात आलेला भर. पालक आणि ग्रामस्थांनी आपल्या गावातील शाळेत जाऊन उपलब्ध सुविधांची पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का, मुला-मुलींसाठी स्वतंत्र आणि वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे आहेत का, वर्गखोल्या सुरक्षित आहेत का, शाळेपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता आहे का, यासह अन्य मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे.
शाळेची अवस्था खराब असल्यास तिचे फोटो, आवश्यक माहिती आणि संबंधित पुरावे CJP च्या माध्यमातून संकलित केले जाणार आहेत. हे पुरावे प्रशासनासमोर सादर करून संबंधित समस्या सोडवण्यासाठी निश्चित मुदत देण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
चांगले काम करणाऱ्या सरपंचांचा गौरव
गावातील शाळांच्या विकासात ग्रामपंचायत आणि सरपंचांची भूमिका महत्त्वाची असल्याने चांगले काम करणाऱ्या सरपंचांचा विशेष गौरव करण्याची योजनाही या अभियानात आहे. शाळांच्या सुधारणेसाठी पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सोशल मीडियावर कौतुक करून त्यांच्या कामाची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे इतर गावांनाही शाळा सुधारण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा अभियानाचा उद्देश आहे.
‘प्रत्येक मुलाच्या सुरक्षित शिक्षणाच्या हक्काचा लढा’
“देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे होत आली तरी आपल्या मुलांना मूलभूत सुविधांसाठी याचना करावी लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. ही मोहीम केवळ आंदोलन नसून प्रत्येक मुलाच्या सुरक्षित शिक्षणाच्या हक्काचा लढा आहे,” अशी भूमिका आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी मांडली.
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही या अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा CJP कडून करण्यात आला आहे. त्यामुळे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण सरकारी शाळांच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.






