नवी दिल्ली, दि. १५ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून देशाला संबोधित केले. स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करताना त्यांनी ‘विकसित भारत २०४७’चे लक्ष्य अधोरेखित केले. भारताने मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी मोठे संकल्प करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ला विशेष स्थान मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’चे सादरीकरण झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ‘आज प्रत्येक हृदयात वंदे मातरम्चा नाद आहे’, असे सांगत त्यांनी देशवासीयांमध्ये राष्ट्रभावनेची जाणीव अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधींसह स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांना आदरांजली वाहिली. गेल्या काही दिवसांत देशातील काही भागांत आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली. संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
‘फ्रॅजाइल फाइव्ह’पासून वेगवान अर्थव्यवस्थेपर्यंत
भारताच्या आर्थिक प्रवासाचा उल्लेख करताना मोदी यांनी २०१४ मध्ये भारताचा समावेश ‘फ्रॅजाइल फाइव्ह’मध्ये केला जात होता, असे सांगितले. गेल्या १२ वर्षांत भारताने विकासाचा वेग वाढवला असून आज भारत जगातील प्रमुख वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचा दावा त्यांनी केला. २०४७मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प त्यांनी पुन्हा व्यक्त केला.
‘आत्मनिर्भर भारत’ावर भर
भारताने इतर देशांवरील अवलंबित्व कमी करून आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ‘व्होकल फॉर लोकल’ला चालना देण्याचे आवाहन करताना देशांतर्गत उत्पादन आणि क्षमताविकासाला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी दिला.
कायदे आणि धोरणांमध्ये काळानुरूप बदल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. २१व्या शतकातील भारताला जुन्या शतकातील कायद्यांच्या आधारावर पुढे नेता येणार नाही, असे मोदी म्हणाले.
सेमीकंडक्टर, महत्त्वाची खनिजे आणि अणुऊर्जेवर भर
भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाची खनिजे, सेमीकंडक्टर आणि ऊर्जा क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशात सेमीकंडक्टर उत्पादन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अणुऊर्जेच्या क्षेत्रात मोठे लक्ष्य ठेवून पाच नवीन अणुभट्ट्या उभारण्याच्या दिशेने भारत पुढे जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या भाषणात युवा शक्ती, आर्थिक विकास, आत्मनिर्भरता आणि २०४७पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प हे प्रमुख मुद्दे ठरले.
‘मोठी स्वप्ने पाहा, मोठे संकल्प करा आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीने पुढे चला’, असा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.








