दादर ते कुडाळ विशेष रेल्वे; १२ सप्टेंबरला सकाळी १० वाजता सुटणार

मालवण : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून विशेष मोफत रेल्वे प्रवासाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ या नावाने दादर ते कुडाळ असा हा विशेष रेल्वे प्रवास आयोजित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोकणवासीयांना आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुलभ आणि मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘गणरायाचं आगमन, ढोल-मृदुंगाची साथ, गावाकडे चला, गणेशोत्सवाचा नाद!’ अशा घोषवाक्यासह या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे.
या विशेष रेल्वेचा प्रवास दादर ते कुडाळ असा असणार असून, १२ सप्टेंबर २०२६ रोजी शनिवारी सकाळी १० वाजता दादर येथून रेल्वे सुटणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी या मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी वेळेत बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार ते शनिवार बुकिंगची सुविधा
या विशेष प्रवासासाठी सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बुकिंग करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बुकिंगसाठी कुडाळ आणि मालवण तालुक्यातील मतदान कार्ड तसेच आधार कार्ड अनिवार्य असल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक, रेल्वे आरक्षणाची मर्यादित उपलब्धता आणि प्रवासाचा वाढता खर्च लक्षात घेता या उपक्रमाचा कोकणवासीयांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांनी केले आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा मोफत रेल्वे प्रवास दिलासा देणारा ठरणार आहे.






