मालवण (प्रतिनिधी):
दशावतार कलाकारांच्या समस्या, व्यथा आणि न्याय्य हक्कांसाठी सातत्याने शासन दरबारी आवाज उठवणारे पत्रकार मनोज चव्हाण यांचा पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका मालवण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मनोज चव्हाण यांनी हा सत्कार केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी असल्याची भावना व्यक्त केली. “हा सन्मान माझा एकट्याचा नसून दशावतार या समृद्ध लोककलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा आहे. कलाकारांच्या डोळ्यातील विश्वास आणि मनातील आपुलकी हीच माझी खरी ताकद असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी यापुढेही अधिक जोमाने लढत राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सन्मानाबद्दल त्यांनी संघाचे सचिव विनायक पांडुरंग येरागी, सहसचिव विनोद सुरेश परब, खजिनदार नितीन दिगंबर घाडी, श्रेयस खोत, पप्पू घाडी, पवन वालावलकर, ॲड. प्रथमेश सामंत तसेच उपस्थित सर्व दशावतार कलाकारांचे मनःपूर्वक आभार मानले.







