नगरपरिषदेचा नागरिकाभिमुख उपक्रम; शहरातील प्रमुख ठिकाणी उभारणार बैठक व्यवस्था
मालवण (प्रतिनिधी):
मालवण शहरातील नागरिकांच्या दैनंदिन सुविधांमध्ये भर घालण्यासाठी मालवण नगरपरिषदेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक व मजबूत सिमेंट बेंचेस बसविण्यात येणार असून, प्रमुख व गर्दीच्या ठिकाणांची निवड करून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपरिषद सातत्याने विविध विकासकामे राबवत आहे. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला असून, त्या निधीतून अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामे वेगाने सुरू असल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे वराडकर यांनी सांगितले.
खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सहकार्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक विकासकामांसाठी एकजुटीने कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक ठिकाणी सिमेंट बेंचेस उभारण्याच्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, पर्यटक तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम होणार असून, नगरपरिषदेच्या या निर्णयाचे मालवणकरांकडून स्वागत होत आहे.







