मालवण (प्रतिनिधी)
महायुती सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा खासदार-आमदार फोडण्यात आणि सत्तेचे राजकारण करण्यात अधिक व्यस्त असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. जनतेच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने विरोधक म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून हे प्रश्न लावून धरण्याची जबाबदारी आता आपली असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.
मालवण तालुक्यातील आडवली-मालडी, सुकळवाड, मसुरे आणि आचरा या चार जिल्हा परिषद विभागांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या विभागनिहाय बैठका माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यावेळी संघटनात्मक आढावा घेण्यात आला.
बैठकीस ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर, उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, बाबा सावंत, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, विभागप्रमुख समीर लब्दे, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष धुरी यांच्यासह विविध विभागांतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी केंद्र व राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. देशात महागाई वाढत असून स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सिंधुदुर्गात स्मार्ट वीज मीटर आणि अणुऊर्जा प्रकल्प जनतेवर लादले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांना वगळण्यात आल्याचा, अनेकांना योजनेचे पैसे मिळत नसल्याचा, अपूर्ण विकासकामांची बिले काढली जात असल्याचा तसेच जिल्ह्यात अवैध धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचा आरोप करत केंद्र व राज्यातील भाजप-महायुती सरकार या सर्व बाबींमध्ये अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
संघटनात्मक मार्गदर्शन करताना वैभव नाईक यांनी मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानात शिवसेनेच्या बीएलएंनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आचरा येथील महावितरण कार्यालय आणि सबस्टेशनमध्ये सहाय्यक अभियंता व उपअभियंता ही रिक्त पदे आठ दिवसांत भरली नाहीत, तर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
बैठकींना सचिन कुमामेकर, सुधीर कदम, विठ्ठल घाडी, विजय परब, प्रवीण सावंत, विलास घाडी, लक्ष्मण घाडीगावकर, मनोज राऊत, राहुल सावंत, दिलीप परब, जीवन कांदळगावकर, प्रणय मयेकर, दिगंबर सावंत, सचिन रेडकर, माणिक राणे, श्यामसुंदर घाडी, राजेंद्र घाडी, संजय सामंत, अर्चना पांगे यांच्यासह विविध विभागांतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



