मालवण (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गाची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या दशावतार, भजन आणि कीर्तन कलाकारांच्या विविध मागण्यांसाठी आमदार निलेश राणे यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कलाकारांसाठी वार्षिक साडेचार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले असून कलाकारांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्थानिक पातळीवर शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दशावतार कलाकारांचा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केला.
मालवण येथील महायुती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेविका शर्वरी पाटकर, देवेंद्र नाईक, राजा सामंत, भाऊ मोरजे, राजू बिडये, भाई मांजरेकर, सूर्यकांत पालव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दत्ता सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ८६ पारंपरिक दशावतार कंपन्या असून अडीच ते तीन हजार कलाकार या कलेशी जोडलेले आहेत. याशिवाय जिल्ह्यात १५ ते २० हजार भजनी कलाकार कार्यरत आहेत. मात्र शासनाकडून दरवर्षी केवळ १०० कलाकारांना मानधनाचा लाभ मिळत असल्याने हा कोटा अत्यंत अपुरा आहे.
हा मानधनाचा कोटा किमान तिप्पट वाढविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच वर्षभरात ५० पेक्षा अधिक प्रयोग करणाऱ्या ज्येष्ठ दशावतार कलाकारांना ‘अ’ दर्जा देऊन मानधन वितरणात प्राधान्य देण्याची मागणीही शासनाकडे करण्यात येणार असल्याचे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.




