पणजी : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी पंढरपूरमध्ये स्वतंत्र ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. याशिवाय, नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना प्रवासासाठी ₹१ लाख ते ₹५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या गोमंतकीय वारकऱ्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. गोव्यातून दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूरला जात असले, तरी त्यांच्यासाठी कायमस्वरूपी मुक्कामाची सुविधा उपलब्ध नव्हती. ही गरज ओळखून मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ प्रकल्पाला आता प्रत्यक्ष आकार मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भवनासाठी आवश्यक जागा निश्चित करण्यात आली असून, पुढील आषाढी एकादशीपूर्वी हे भवन पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. या भवनामुळे गोमंतकीय वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये सुरक्षित, सुसज्ज आणि हक्काचे निवासस्थान उपलब्ध होणार आहे.
यासोबतच, गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत राज्यातील ३६ नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येनुसार ₹१ लाख ते ₹५ लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार असून, ही रक्कम थेट नोंदणीकृत दिंडींना वितरित केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत किमान ४० वारकरी असलेल्या नोंदणीकृत दिंड्यांना परतीच्या बसप्रवासासाठी आर्थिक मदत, आवश्यक सुविधा आणि इतर सहाय्य दिले जाणार आहे. या उपक्रमात सुमारे ३,५०० वारकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून, प्लास्टिकमुक्त वारीला प्रोत्साहन देण्यासाठी कापडी पिशव्या, पारंपरिक वारकरी वेशभूषा, औषधांचे संच (मेडिकल किट) तसेच वारी मार्गावर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.




