मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील धुरीवाडा परिसरातील सायबा हॉटेलजवळील धोकादायक अवस्थेतील वीज खांब अखेर बदलण्यात आला आहे. ठाकरे शिवसेनेचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांनी या समस्येकडे महावितरणचे लक्ष वेधल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. याबद्दल जोगी यांनी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच या कामात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
धुरीवाडा प्रभाग क्रमांक १ मधील सायबा हॉटेलजवळील विद्युत खांब गेल्या अनेक दिवसांपासून वाकलेल्या अवस्थेत उभा होता. हा खांब कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती. बाबी जोगी यांनी याप्रकरणी महावितरणकडे पाठपुरावा केल्यानंतर संबंधित खांब बदलण्याचे काम हाती घेण्यात आले.
दरम्यान, जोगी यांनी शहरातील अन्य भागांमध्येही अनेक धोकादायक वीज खांब आणि जीर्ण वीजवाहिन्या असल्याकडे लक्ष वेधले आहे. अशा ठिकाणांची पाहणी करून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय चिवला बीच-धुरीवाडा परिसरात समुद्रकिनाऱ्यालगत महावितरणने बसवलेल्या डीपी बॉक्सच्या पेट्या उघड्या अवस्थेत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उघड्या डीपी बॉक्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून महावितरणने त्यांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणीही बाबी जोगी यांनी केली आहे.
पावसाळ्यात वीज यंत्रणांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी महावितरणने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





