मालवण (प्रतिनिधी) : लांबणीवर पडलेला पाऊस अखेर पुन्हा सक्रिय झाला असून काल रात्रीपासून मालवण तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने गेले अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मालवणवासियांना मोठा दिलासा मिळाला. पावसाच्या आश्वासक आगमनामुळे शेतकऱ्यांनीही शेतीच्या कामांना वेग दिला आहे.
जून महिना अखेरीकडे सरकत असतानाही अपेक्षित पाऊस न झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने मालवणात काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सकाळच्या सत्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.
मालवण मेढा परिसरातील नूर मोहम्मद मुजावर यांच्या बंगल्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माडाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत बंगल्याच्या स्लॅबचे नुकसान झाले. तसेच उभी करून ठेवलेल्या पॅरासेलिंग बोटीवरही माड पडल्याने बोटीचेही नुकसान झाले. या घटनेत सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे मालवणकडे आचरा, कणकवली आणि कुडाळ येथून येणाऱ्या तिन्ही वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला. कुडाळ येथून येणाऱ्या वीजवाहिनीवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी दुपारपासून सायंकाळ उशिरापर्यंत मालवण शहर आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित राहिला.
पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक तयारी पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या वीज वितरण कंपनीची पहिल्याच जोरदार पावसात पोलखोल झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे महावितरणच्या नियोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मात्र, पावसाच्या दमदार पुनरागमनामुळे शेतीला संजीवनी मिळाली असून भातलावणीच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.





