मालवण, प्रतिनिधी : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबल्याने आणि शेतकरी वर्ग चिंतेत सापडल्याने मालवण तालुक्यातील कसबा आचरा येथे श्री देव रामेश्वर संस्थानच्या वतीने प्राचीन परंपरेनुसार श्री देव ठाणेश्वर देवतेवर विशेष जलाभिषेक करण्यात आला. देवस्थान मानकरी, देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या सहभागातून पार पडलेल्या या धार्मिक विधीनंतर परिसरात पावसानेही जोरदार हजेरी लावल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
आचरा गावातील प्राचीन परंपरेनुसार मंगळवारी सकाळी रामेश्वर मंदिरालगत असलेल्या श्री देव ठाणेश्वर मंदिरात हा धार्मिक विधी पार पडला. यावेळी देवस्थान मानकरी, देवस्थान समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत ठाणेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक केला. रामेश्वर मंदिरालगतच्या विहिरीतून कळशा आणि बादल्यांद्वारे पाणी आणून पिंडी पूर्णपणे पाण्याखाली जाईपर्यंत अखंड जलाभिषेक करण्यात आला.
विधीपूर्वी श्री देव रामेश्वर आणि श्री देव ठाणेश्वर यांना सांगणे करण्यात आले. पारंपरिक ताशांच्या गजरात सुरू झालेला जलाभिषेक सुमारे तासभर सुरू होता. अखेरीस संपूर्ण गाभारा पाण्याने भरून ठाणेश्वराची पिंडी पाण्याखाली गेल्यानंतर विधीची सांगता करण्यात आली.
देवस्थान समितीचे सचिव संतोष मिराशी यांनी सांगितले की, नैसर्गिक संकटे आणि संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संकट निवारणासाठी देवाला पाण्यात ठेवण्याची आणि संततधार जलाभिषेक करण्याची परंपरा आचरा गावात प्राचीन काळापासून सुरू आहे. श्री देव रामेश्वर आणि श्री देव ठाणेश्वर यांच्या कृपेने संकट दूर होईल, अशी ग्रामस्थांची श्रद्धा असून यापूर्वीही अशा धार्मिक विधींनंतर संकटे दूर झाल्याचे अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.
देवस्थान समितीचे सदस्य संजय मिराशी यांनीही जनकल्याणासाठी आणि संभाव्य दुष्काळाचे संकट दूर व्हावे या भावनेतून ग्रामस्थांनी परंपरेनुसार देवाला साकडे घातल्याचे सांगितले.
या धार्मिक विधीस आचरा गावातील बारापाच मानकरी, देवस्थान समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्जन्यप्राप्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक जलाभिषेकाची तालुकाभर चर्चा रंगली आहे.





