सिंधुदुर्गनगरी, दि. 17 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तिरवडे (ता. मालवण) येथे ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार’ या विषयावरील जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास पॅनल विधीज्ञ ॲड. रुपेश परुळेकर, सरपंच रेश्मा गावडे, उपसरपंच सुशील गावडे, पंचायत समिती सदस्य संतोष गावडे, पोलीस पाटील संतोष जामसंडेकर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. रुपेश परुळेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, संरक्षण, कल्याण, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि न्याय मिळविण्याच्या विविध तरतुदींविषयी सविस्तर माहिती दिली. वृद्धापकाळात अनेक ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक दुर्लक्ष, आर्थिक असुरक्षितता आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी ‘ज्येष्ठ नागरिक कायदा, 2007’ अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या सांभाळास नकार दिल्यास संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा. अशा अर्जांवर 90 दिवसांच्या आत निर्णय घेतला जातो. तसेच मुलांच्या उत्पन्नाचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा कमाल 10 हजार रुपयांपर्यंत निर्वाहभत्ता देण्याची तरतूद कायद्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.
अपत्य नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत त्यांच्या संपत्तीचा वारसा मिळणाऱ्या व्यक्तीवर उदरनिर्वाहाची जबाबदारी येते. अशा व्यक्तीकडूनही निर्वाहभत्ता मागण्याचा कायदेशीर अधिकार ज्येष्ठ नागरिकांना असल्याचे ॲड. परुळेकर यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.





