मालवण दि प्रतिनिधी
मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी व आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांनी लाल शेवग्याचे नवीन वाण विकसित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, गोंदिया जिल्ह्यातील आमदार राजकुमार बडोले यांनी शुभेच्छा पत्र पाठवत डॉ. फोंडेकर यांच्या कार्याचे कौतुक केले आहे
कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी वं आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांनी आंबा उत्पादनात उज्ज्वल असे यश मिळवीत सर्वात प्रथम आंबा पेटी बाजारात आणण्याची कामगिरी केली असून त्यांच्या या कामगिरीची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेले आहे. तसेच शेती मध्येही नवनवीन प्रयोग करताना डॉ. फोंडेकर यांनी शेवग्याच्या पिकात संशोधन करत लाल शेवग्याचे वाण विकसित केले. या लाल शेवग्याच्या वाणासाठी केंद्र सरकार कडून डॉ. फोंडेकर यांना पेटंट देखील मिळाले. त्यांची ही कामगिरी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय अशी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. उत्तम फोंडेकर यांना पत्र पाठवत अभिनंदन केले आहे. “कृषी क्षेत्र नवनवीन प्रयोगांतून विकसित होत आले आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, तसेच वाढत्या उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील स्पर्धा यांचा विचार करता, शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा आणि सुधारित वाणांचा अवलंब करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत डॉ. फोंडेकर यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे कार्य उल्लेखनीय ठरते. त्यांनी विकसित केलेले वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस हातभार लावून कृषी समृद्धी साध्य करण्यास उपयुक्त ठरेल, अशी खात्री वाटते. डॉ. फोंडेकर यांचे हे कार्य नव्या पिढीतील शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हणत डॉ. फोंडेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्राद्वारे डॉ. फोंडेकर यांचे अभिनंदन केले आहे. “डॉ. फोंडेकर यांनी मोनो हायब्रीड पद्धतीचा अवलंब करुन यशस्वीरित्या लाल शेवग्याची निर्मिती केली आहे. त्यांच्या या नव्या लाल शेवग्याच्या वाणाला केंद्र शासनाकडून पेटंट मिळाल्याची बाब अभिनंदनीय आहे. हा वाण व्यापारी शेतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. शेतीमध्ये करिअर करत असलेल्या सर्व तरुणांना हे संशोधन कार्य प्रेरणादायी ठरणारे आहे. डॉ. फोंडेकर हे भविष्यात देखील संशोधनाच्या माध्यमातून विविध प्रगतशील गोष्टी समोर आणतील, याची खात्री वाटते,” असे उपमुख्यमंत्री ना. शिंदे यांनी म्हणत डॉ. फोंडेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही लाल शेवग्याच्या या वाणामुळे पोषक मूल्यांचा प्रश्न सुटण्यास मदत होईलच, तसेच यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीची नवी दारेही उघडली जातील, शिक्षणासोबतच कौशल्य आणि संशोधनाची जोड दिली तर सामान्य माणूसही असामान्य कार्य करू शकतो, याचे उत्तम फोडेकर हे जिवंत उदाहरण आहेत, अशा शब्दात डॉ. फोंडेकर यांचे कौतुक केले आहे. तर डॉ. फोंडेकर यांनी लाल शेवग्याचे वाण जागतिक स्तरावर विकसित केल्याबद्दल आनंद झाला, आमदार राजकुमार बडोले यांनी सांगत अभिनंदन केले आहे.






