सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित वाण आणि योग्य लागवड पद्धतींचा अवलंब करण्यावर भर द्यावा. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांची बैठक झाली. जिल्ह्यात सध्या सुमारे १ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, ऊसतोडणीच्या टोळ्या उशिरा उपलब्ध होणे, वेळेत ऊसतोडणी न होणे तसेच अवेळी लागवड यामुळे उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
ऊसतोडणीचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक
ऊसतोडणीतील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोडणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसतोडणीसाठी आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी साखर कारखान्यांच्या संचालकांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन ऊसतोडणीच्या प्रश्नावर समन्वयातून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सुधारित वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर
जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि योग्य लागवड पद्धतींबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर ऊस उत्पादकता वाढीचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली.
दरम्यान, नापणे येथील ऊस संशोधन केंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासह केंद्राचे बळकटीकरण करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी, साखर कारखाने, कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार शेटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






