एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश; गायत्री शिर्के प्रथम
मालवण प्रतिनिधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गच्या एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने (बॅच २०२१) अंतिम वर्ष परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची भक्कम छाप उमटविली आहे. या परीक्षेत महाविद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ९८.९४ टक्के लागला असून, तळकोकणातील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे.
अंतिम वर्ष परीक्षेत कुमारी गायत्री शिवराम शिर्के हिने ७४.२२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, कुमार मिथ जयेश जोशी यांनी ७३.२२ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर कुमारी सानिका भाऊसाहेब चौगुले हिने ७१.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिंधुदुर्गनगरी या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचने मिळविलेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह अध्यापन पद्धती, शैक्षणिक वातावरण आणि महाविद्यालयाच्या एकूण कार्यक्षमतेची प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांसोबतच प्राध्यापक व डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे हे यश असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, उप-अधिष्ठाता (यूजी) डॉ. श्रेयश बुरुटे आणि उप-अधिष्ठाता (पीजी) डॉ. संतोष फुपरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना दिवस-रात्र शैक्षणिक मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापक, डॉक्टर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा एक अभिमानास्पद क्षण असून, पहिल्या बॅचने मिळविलेल्या या दैदिप्यमान यशामुळे जिल्हाभरातून विद्यार्थ्यांवर आणि महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग हे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.







