मालवण दि प्रतिनिधी
“सानेगुरुजींची पुस्तके ही प्रत्येक पिढीच्या व्यक्तिमत्व विकासाचे दीपस्तंभ आहेत. आज 21 व्या शतकातही गुरुजींची सर्व पुस्तके तरुण पिढीला मार्गदर्शक अशीच आहेत.” असे प्रतिपादन अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांनी येथे बोलताना केले .
साने गुरुजींच्या 76 व्या पुण्यतिथीचे आयोजन केंद्रशाळा आचरे नंबर 1 येथे सानेगुरुजी कथामाला मालवण आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी आयोजित विद्यार्थी- पालक- शिक्षक यांच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री ठाकूर यांनी आपल्या जीवनात श्यामची आई पासून सुंदर पत्रेपर्यंत आणि गोड गोड गोष्टींपासून भारतीय संस्कृतीपर्यंत जवळजवळ 73 पुस्तके लिहिली. सर्वच पुस्तके शिक्षक, पालक आणि मुलांसाठी आजही मार्गदर्शक ठरतील अशीच आहेत असे सांगितले
यावेळी बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने 34 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणनिधीचे वाटप बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे उपाध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शैलेश खंडाळकर यांनी बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. मंदार सांबारी यांनी यावेळी रसिका तेंडुलकर यांची साने गुरुजी जीवनदर्शन ही कविता वाचून रसिकांची मनी जिंकली. यावेळी व्यासपीठावर सदानंद कांबळी उपाध्यक्ष सानेगुरुजी कथामाला मालवण, परुळेकर, सिद्धेश हळवे संजय आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी पांडुरंग कोचरेकर यांनी सानेगुरुजी कथामाला मालवणच्या विविध कार्याची माहिती दिली. यावेळी रावजी तावडे, परशुराम गुरव, संजय परब शारदा बिसेन, मृणालिनी आचरेकर, सायली परब, भावना मुणगेकर, स्मिता जोशी, कामिनी ढेकणे, नेहा बापट या कथामाला कार्यकर्त्यांसोबत जवळजवळ शंभर विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामचंद्र कुबल यांनी केले तर आभार मनाली फाटक यांनी मानले.







