मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा सोमवारी वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या वितरणात ५ हजार ८६ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यात ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.
यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९ कोटी रुपयांचा निधी वितरित करून ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून आतापर्यंत १० हजार ११५ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.
५६ लाख शेतकऱ्यांना लाभाचे लक्ष्य
राज्य सरकारकडून या योजनेचा लाभ टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. या योजनेअंतर्गत ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे, तर २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे नियोजन आहे. एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून सुमारे ४० हजार ९८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थ्यांची संख्या प्रक्रियेनुसार अद्ययावत होत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
कर्जमाफीची मर्यादा दोन लाखांपर्यंत
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विविध शेतकरी संघटनांकडून कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यानुसार कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला.
सुरुवातीला २०१९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारने निर्णयात बदल करत अशा शेतकऱ्यांचेही दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.
अॅग्रीस्टॅक, आधार प्रमाणीकरण बंधनकारक
कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी दोन्ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
सरकारकडून कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी टप्प्यांमध्ये आणखी किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळतो, याकडे राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.





