पर्यटन तालुका म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. मालवण तहसील कार्यालयातील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मालवण तहसील कार्यालयात सेतू, रेशनिंग, महसूल, समाजकल्याण तसेच जमिनीच्या सुनावणीसाठी दररोज तालुकाभरातून नागरिक येत असतात. मुंबईहून आलेले चाकरमानी आणि पर्यटकही विविध कामांसाठी तहसील कार्यालयात दाखल होत असतात. मात्र कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाची अवस्था अत्यंत भयावह बनली आहे.
शौचालयाचे दरवाजे मोडकळीस आले असून आत पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक दाबूनच शौचालय परिसरातून जावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे की, तहसील कार्यालयालगतच पोलीस ठाणे, रॉक गार्डन आणि सरकारी विश्रामगृह आहे. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांची अशी गैरसोय होणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. अनेकदा नागरिकांना कामासाठी तासनतास तहसील कार्यालयात थांबावे लागते. अशा परिस्थितीत नैसर्गिक विधीसाठीही योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे.
तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस पुरेशी जागा उपलब्ध असून तेथे सुसज्ज आणि स्वच्छ शौचालय उभारता येऊ शकते. मात्र प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तहसीलदारांनी याबाबत तातडीने खुलासा करून दुरुस्ती, स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून शौचालयाची दुरवस्था कायम असूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवणमध्ये अशा मूलभूत सुविधांचा अभाव तालुक्याच्या प्रतिमेला धक्का देणारा असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष न दिल्यास या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुरेश बापर्डेकर यांनी दिला आहे.







