मालवण | प्रतिनिधी
मालवण शहर आणि तालुक्यात भरधाव डंपर वाहतुकीमुळे वाढणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी रात्री मालवण शहरातील सागरी महामार्गावर भरधाव डंपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने विरेश विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून बेफाम डंपर वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
ही दुर्घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास आराध्या हॉटेलसमोरील रस्त्यावर घडली. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कोळंब येथून देऊळवाड्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (एमएच ०७ सी ५४०४) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (एमएच ०७ एएन ४४५९) धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार विरेश कदम गंभीर जखमी झाले, तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी (रा. धुरीवाडा, मालवण) यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार डंपर चालक प्रभाकर हनुमंत वडार (रा. न्यू खासकीलवाडा, सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विरेश कदम यांना प्रथम मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले. यावेळी रोहन कदम, विहार कोदे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
मालवण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डंपर चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (A), १२५ (B) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर करत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिक, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत मालवण पोलीस ठाण्यात गर्दी केली. ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, रविकिरण तोरसकर, ललित चव्हाण, नगरसेविका अनिता गिरकर यांच्यासह अनेकांनी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेत शहरातील बेफाम डंपर वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली.
मालवण शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहतूक आणि त्यात भरधाव धावणारे डंपर यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार अपघात होत असूनही संबंधित यंत्रणा कठोर उपाययोजना करत नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे..







