मालवण | प्रतिनिधी
मालवण दांडी आवार परिसरातील विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) अचानक जळाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा अवघ्या २४ तासांत पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे १०० केव्हीचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून परिसरातील वीज समस्या तातडीने मार्गी लावण्यात आली.
दांडी येथील ट्रान्सफॉर्मर काल रात्री अचानक जळाल्याने संपूर्ण परिसर अंधारात गेला होता. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. ही माहिती मिळताच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या.
पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्याकडे या समस्येबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात आला. नगरपालिकेतील भाजप गटनेत्या अन्वेषा आचरेकर आणि भाजप तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवून नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून घेतले.
आज दिवसभर महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे आणि त्यांच्या पथकाने युद्धपातळीवर काम केले. नवीन १०० केव्हीचे ट्रान्सफॉर्मर बसवून ते सायंकाळपर्यंत कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जनतेची गैरसोय टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर तातडीने पाठपुरावा करण्यात आला. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत हे काम पूर्ण झाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ऐनवेळी धावून येत काही तासांतच वीज समस्या मार्गी लावल्याबद्दल दांडी आवार येथील नागरिकांनी राणे कुटुंबीय, भाजप पदाधिकारी आणि महावितरण कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.







