मालवण : प्रतिनिधी
पर्यटन हंगामाला सुरुवात झाल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मालवण बंदर विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘आय.व्ही. अॅक्ट १९१७’ अंतर्गत नोंदणीकृत प्रवासी नौका व बोटींतून पर्यटकांना निवती लाईट हाऊस तसेच ‘म्हातारीची चूळ’ परिसरात जलसफरीसाठी घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करून अपघात अथवा जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित नौका मालक व चालकाची राहील, असा स्पष्ट इशारा बंदर विभाग प्रशासनाने दिला आहे.
मागील पर्यटन हंगामात मालवण बंदर हद्दीतील विविध ठिकाणांहून पर्यटकांना बोटीतून निवती लाईट हाऊस परिसरातील खोल समुद्रात नेले जात असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. निवती लाईट हाऊस हे खोल समुद्रात असल्याने या प्रकारामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते.
दरम्यान, १२ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन व्यावसायिक, महाराष्ट्र सागरी मंडळ, पोलीस विभाग, वन विभाग आणि कांदळवन विभागाची संयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जलपर्यटन व्यावसायिकांनी निवती लाईट हाऊस आणि ‘म्हातारीची चूळ’ ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणस्थळे असल्याने तिथे बोटी नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.
मात्र, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य सर्वेक्षक व सागरी अभियंत्यांनी ‘आय.व्ही. अॅक्ट १९१७’मधील तरतुदी स्पष्ट केल्या. या कायद्यानुसार नोंदणीकृत नौकांना केवळ निर्धारित ‘आय.व्ही. लिमिट’च्या आतच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे. निवती लाईट हाऊस हे किनाऱ्यापासून सुमारे ५.२९ नॉटिकल मैल अंतरावर असून ते ‘आय.व्ही. लिमिट’च्या बाहेर येते. त्यामुळे या कायद्यांतर्गत नोंदणीकृत नौकांना निवती लाईट हाऊस परिसरात जाण्यास कायदेशीर मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांची प्रवासी वाहतूक करायची असल्यास संबंधित नौकाधारकांनी आपल्या बोटीची नोंदणी ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग’कडे करणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘आय.व्ही. अॅक्ट’अंतर्गत नोंदणीकृत बोटींमधून पर्यटकांना नियमबाह्य पद्धतीने खोल समुद्रात नेणे हा सागरी सुरक्षा नियमांचा तसेच शासकीय नियमांचा गंभीर भंग मानला जाईल. अशा बेकायदेशीर वाहतुकीदरम्यान अपघात झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित नौका मालक आणि चालकाची राहील, असे बंदर निरीक्षकांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.








