मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार, मालवणची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेज, मालवणच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. संस्थेच्या मालमत्तेचा विकास करून व्यवसायवृद्धी साधण्यासोबतच ग्राहक सभासदांना अधिकाधिक सुविधा व नवनवीन सेवा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
सभेचे प्रमुख पाहुणे एस.टी. महामंडळाच्या मालवण डेपोचे व्यवस्थापक श्री. सूर्यवंशी यांच्या हस्ते सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या कट्टा शाखेतील कर्मचारी श्रीमती स्वप्ना संजय मोर्वेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला. आचरा शाखेतील कर्मचारी कु. भक्ती गणपत कानविंदे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. जी. पाटील यांचा संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित सभासद व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या विकासासाठी धडाडीने निर्णय घेणारे अध्यक्ष श्री. तळवडेकर यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना श्री. सूर्यवंशी यांनी संस्थेच्या विधायक कार्याचे तसेच कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्ष श्री. तळवडेकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संस्थेचा विकासात्मक पाया अधिक मजबूत करण्यासाठी आणि संस्थेच्या व्यवसायवृद्धीसाठी धाडसी व धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असे सांगितले. यासाठी सर्व सभासदांनी वेळोवेळी मौलिक सूचना व सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष श्री. तळवडेकर यांच्या गेल्या तीन महिन्यांतील विकासात्मक कामगिरीचे उपस्थित सभासदांनी विशेष कौतुक केले. संस्थेच्या प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांचे अभिनंदन करत सभासदांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला.
या वार्षिक सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, व्यापारी पत्रक आणि वार्षिक अंदाजपत्रक यावर चर्चा करण्यात आली. तसेच मालवण शहरातील संस्थेच्या ७.५४ गुंठे जागेचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या मालमत्तेचा योग्य विकास करून व्यवसायवृद्धी साधण्याच्या दृष्टीने या निर्णयाला विशेष महत्त्व आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मारुती सोनवडेकर, संस्थापक अध्यक्ष पी. जी. पाटील, संचालक प्रमोद मोहिते, प्रताप बागवे, विनोद सातार्डेकर, सुरज गवंडी, गंगाराम कोकरे, मंगेश परब, हनुमंत प्रभू, प्रशांत पारकर, विठ्ठल मालंडकर, हेमंत तळवडेकर, रूपेश खोबरेकर, सुप्रिया गावंकर, जयश्री हडकर, देवानंद लोकेगावकर, कृष्णा गावंकर, जगन्नाथ गावडे, चंद्रकांत कुबल, सचिन गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, नागेश कदम, नागेश अटक, बाजेल फर्नांडीस आदींसह संस्थेचे सभासद, कर्मचारी व पालक उपस्थित होते.







