मालवण (प्रतिनिधी)
वेतनत्रुटी समिती २०२४ च्या शिफारशींची जिल्हा परिषद कार्यालयाकडून अंमलबजावणी झालेली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघातर्फे दि. ८ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश राणे आणि उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी दिली
जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत जिल्हा परिषद कार्यालयाकडे वेळोवेळी पत्र व्यवहारही केला असून प्रत्यक्ष भेटून चर्चाही केलेली आहे. मात्र जिल्हा परिषद कार्यालयाकडून अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे सेवानिवृत्तांमध्ये फार मोठी नाराजी निर्माण झालेली आहे. सेवात्रुटी समिती २०२४ च्या शिफारशीची अंमलबजावणी न झाल्यास शुक्रवार दि. ८ रोजी सकाळी ११ ते ४ वा. या वेळेत आपल्या जि.प. कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघातर्फे देण्यात आला होता. त्यानुसार उद्या ८ मे रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.







