मालवण, दि प्रतिनिधी
मालवण हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आल्याने सध्या शहरात पर्यटकांची प्रचंड मांदियाळी पाहायला मिळत आहे. मात्र, या वाढत्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून ही कोंडी फोडण्यासाठी शहरात तातडीने पोलीस आणि होमगार्डची नियुक्ती करावी, अशी मागणी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात हे देखील उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरातील देऊळवाडा प्रवेशद्वार, सागरी महामार्ग जंक्शन, एस.टी. स्टँड, तारकर्ली नाका, भरड नाका, बाजारपेठ, मालवण जेटी, फोवकांडा पिंपळ आणि माघी गणेश चौक या ठिकाणी सतत होणाऱ्या कोंडीमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांना रस्ता मिळणे कठीण झाल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याबद्दल नगराध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे.
शहरातील अरुंद रस्त्यांवरून धावणाऱ्या खासगी लक्झरी बसेस हे वाहतूक कोंडीचे एक प्रमुख कारण ठरत आहेत. यावर उपाय म्हणून सौ. वराडकर यांनी खासगी लक्झरी बसेसना शहराच्या अंतर्गत अरुंद रस्त्यांवर प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालावी. या बसेसना केवळ ‘सागरी महामार्गावरूनच’ प्रवासी घेण्याच्या व उतरविण्याच्या सूचना वाहतूक शाखेमार्फत देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
वाहतूक कोंडीसोबतच पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधावा, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली. पर्यटन हंगाम संपेपर्यंत वरील सर्व मुख्य नाक्यांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करावेत, जेणेकरून शहराची सुव्यवस्था राखली जाईल आणि नागरिकांची गैरसोय टळेल. मालवणच्या पर्यटनाला बाधा येऊ नये आणि स्थानिक नागरिकांनाही त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ आदेश निर्गमित करून बंदोबस्त वाढवणे गरजेचे आहे असेही नगराध्यक्षा सौ. वराडकर यांनी म्हटले आहे.







