मालवण – प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान तर्फे कु. सिद्धी राऊत या विद्यार्थिनीला तिच्या शिक्षणासाठी आवश्यक असा लॅपटॉप नुकताच प्रदान करण्यात आला.
कु. सिद्धी राऊत ही सध्या रत्नागिरी येथील गोगटे महाविद्यालयात बायोटेक्नॉलॉजी या विषयात बीएससीचे शिक्षण घेत आहे. तिच्या शिक्षणाचा तसेच वसतिगृहात राहण्याचा संपूर्ण खर्चही प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असून, तिच्या प्रगतीसाठी सातत्याने पाठबळ दिले जात आहे.
विशेष म्हणजे, सिद्धी राऊत हिची शिफारस स्वतः स्व. संजय नाईक यांनी ती वराडकर विद्यालय कट्टा येथे शिक्षण घेत असतानाच केली होती. त्यांच्या त्या दूरदृष्टीतूनच आज तिच्या शैक्षणिक प्रवासाला दिशा मिळत आहे.
या उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.







