मालवण दि प्रतिनिधी :
“शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि खऱ्या अर्थाने जो विद्यार्थी असतो, त्याला कधीच सुट्टी नसते. आपल्यातील सुप्त कलागुणांचा आणि कौशल्यांचा विकास करून स्वतःला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुट्टीचा काळ सत्कारणी लावला पाहिजे,” असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मेष मसुरेकर यांनी मसुरे येथे केले.
केंद्रशाळा मसूरे नं. १ येथे आयोजित ‘झावळांपासून झाडू विणणे’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील पारंपरिक कलेचे जतन आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख नारायण देशमुख, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, शिक्षणप्रेमी शीतल मसुरकर, मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर, हेमलता दुखंडे, ईश्वर सुरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसिद्ध प्रशिक्षक अरुण आंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. नारळाच्या झावळ्यांपासून (हिरांपासून) मजबूत आणि टिकाऊ झाडू कसा तयार करायचा, याचे सविस्तर प्रात्यक्षिक त्यांनी दिले. झावळ्या तासून हीर मोकळे करणे, ते साफ करून वाळवणे आणि त्यानंतर कौशल्याने त्यांची वेणी गुंफून घट्ट जुडी बांधणे, या सर्व प्रक्रिया आंबेरकर यांनी विद्यार्थ्यांना शिकवल्या. केवळ पाहूनच नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः हाताने हिरांची वेणी गुंतून प्रत्यक्ष झाडू तयार करण्याचा अनुभव घेतला. यावेळी प्रशिक्षक अरुण आंबेरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रशिक्षणाचे औचित्य साधून इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पाककृती’ उपक्रमही राबवला. विद्यार्थिनींनी स्वतः चविष्ट ‘कांदे भजी’ बनवून सर्व प्रशिक्षणार्थींना त्याचा आस्वाद दिला. परीक्षा संपलेली असतानाही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.
केंद्रप्रमुख नारायण देशमुख यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करून “मिळालेला प्रत्येक क्षण शिक्षणासाठी वापरून व्यक्तिमत्व विकास घडवणे गरजेचे आहे. केंद्रशाळेमार्फत दरवर्षी असे जीवनोपयोगी उपक्रम राबवले जातात, ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले
या कार्यशाळेचा लाभ सुजाता वेडेकर, गणेश घुगे, दर्शन हजारे, प्रगती मोरे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे आभार अमेय मेस्त्री यांनी मानले. कोकणची ही लोप पावत चाललेली कला जोपासण्याचा शाळेचा हा प्रयत्न सर्व स्तरांतून वाखाणला जात आहे.







