मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये अवैध मटका जुगार छुप्या आणि उघड मार्गाने मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी उद्या ता. १ मे पासून पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षकांना सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील विविध भागांत अवैध मटका जुगार राजरोसपणे सुरू आहे. या संदर्भात ६ मार्च २०२६ रोजी लेखी पत्राद्वारे पोलिसांना कल्पना देण्यात आली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते, मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, पोलिसांच्या या ढिम्म प्रतिसादामुळे जुगार व्यावसायिकांना प्रशासनाचे अभय असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अवैध मटका जुगार बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही, मालवण पोलीस या सूचनांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. या अवैध व्यवसायांमुळे तालुक्यातील तरुण वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आम्ही वारंवार पुराव्यासह तक्रारी दिल्या, तरीही प्रशासन प्रत्यक्ष छापे टाकून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता लोकशाही मार्गाने लढा देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” असे श्री. जोगी यांनी म्हटले आहे. आपल्या मागणीसाठी ते उद्या सकाळी १० वाजता मालवण पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.







