मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील चौके ते कुडाळ मार्गावरील धामापूर परिसरातील मुख्य रस्त्यानजीकच्या माळरानावर गवा रेड्यांचा कळप संचार करताना दिसून आल्याने ग्रामस्थ व या मार्गावरून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गवा रेड्यांचा संचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याबाबत वन विभागाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
चौके ते कुडाळ मार्गावर धामापूर परिसरात रस्त्यालगत माळरानावर यापूर्वीही गवा रेडे संचार करताना दिसून आले होते. या गवा रेडे रस्त्यावर आल्याने अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा या परिसरात गवा रेड्यांचा संचार वाढला असून एकाच वेळी सुमारे दहा ते पंधरा गवारेड्यांचा कळप माळरानावर संचार करताना दिसून आला असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हे गवा रेडे अनेकवेळा रस्ता ओलांडून जात असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गवारेड्यांचा संचार वाढला असताना वं अपघात घडत असताना याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत असून या गवारेड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने योग्यती उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.








