मालवणः (प्रतिनिधी)
मालवण एसटी डेपोमागील समाज मंदिराच्या आवारात वडाच्या झाडाच्या पारंब्या इलेक्ट्रिक तारेमध्ये अडकून शॉक लागत असल्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. ही बाब मालवण नगरपालिकेचे मागासवर्गीय कल्याण समितीचे सभापती सिद्धार्थ जाधव यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली.
यावेळी सिद्धार्ध जाधव यांच्यासह उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर, नगरसेवक महेश कोयंडे तसेच इंजिनिअर बुरले यांनी घटनास्थळी भेट देऊन धोकादायक पारंब्या तात्काळ तोडून घेतल्या. या परिसरात लहान मुले नियमित खेळत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य धोका टळला. या तातडीच्या उपाययोजनेबद्दल बौद्धवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले.






