मालवण (प्रतिनिधी)
मालवणात होणाऱ्या सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे साक्षीदार असलेल्या सागरी किल्ल्यांचा इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने जगासमोर आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे मंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत मालवण येथे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार अभेद्य सागरी किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी विशेष “अध्ययन केंद्र” स्थापन करण्याची घोषणा त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८ वर्षपूर्ती सोहळ्यात केली होती. तसेच त्यांनी या केंद्रासाठी पन्नास लाख रुपयांचा निधीही घोषित केला होता. त्यांच्या घोषणेनुसार मुंबई विद्यापीठ संलग्न स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
मंत्री आशिष शेलार यांच्या या पुढाकाराबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग महाविद्यालय विकास समितीचे सदस्य गुरुनाथ राणे यांच्याहस्ते मंत्री आशिष शेलार यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, कृ. सी..देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सदस्य विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. हसन खान आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी सागरी किल्ले अध्ययन केंद्राच्या स्थापनेसाठी आवश्यक वित्तीय मान्यता व तांत्रिक बाबींमध्ये शासनाच्या स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या अध्ययन केंद्रामुळे सागरी किल्ल्यांच्या इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि वारसा संवर्धनाला नवी दिशा मिळेल व भविष्यात हे केंद्र संशोधनासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल. युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक जलदुर्गांचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी आणि सक्षम, सशक्त राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी या प्रसंगी स्पष्ट केले.








