मालवण : (प्रतिनिधी)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ घेण्यासाठी वैश्विक UDID कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने मालवण तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप UDID कार्ड नाही, त्यांनी ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड काढून त्याची छायांकित प्रत तहसीलदार कार्यालय, मालवण येथील संजय गांधी योजना शाखेत जमा करावी, असे आवाहन तहसीलदार गणेश लव्हे यांच्यावतीने केले आहे.






