सिंधुदुर्ग, दि. २५ : महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या माध्यमातून विविध कृषी व कृषीपूरक प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्र, कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे.
या उपक्रमांत ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण, कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण, कृषी विज्ञान केंद्रामार्फत अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा समावेश आहे.
अर्जाच्या अंतिम मुदती
शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे. आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे कार्यालयास १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.
ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असून, अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी संबंधित सारथी विभागीय कार्यालयास १५ दिवसांच्या आत पाठवाव्यात.
मधुमक्षिकापालन तसेच कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी संबंधित विभागीय कार्यालयास १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात.
कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीच्या कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ आहे. अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे संबंधित सारथी विभागीय कार्यालयास १० दिवसांच्या आत पाठविणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणासाठीचे पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणाचे ठिकाण, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती संबंधित जाहिरात व माहितीपत्रकात देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
अधिक माहितीसाठी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना फलकास भेट द्यावी. सारथीचे संकेतस्थळ sarthi-maharashtra.gov.in आहे. शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासंदर्भातील माहिती sarthi.mahamcdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ही प्रशिक्षण योजना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे लक्षित गटातील पात्र शेतकरी, युवक-युवती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







