मालवण, प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बांदिवडे-पालयेवाडी येथील रहिवासी मयुरेश मंगेश राणे यांचे मार्च महिन्यात अपघाती निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदार तथा पत्नी सौ. मयुरी मंगेश राणे यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपये, असे एकूण चार लाख रुपयांच्या विमा लाभाचा धनादेश प्रदान करण्यात आला.
बँक ऑफ इंडिया, आचरा शाखेत राणे यांचे खाते असून त्यांनी या बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेतली होती. त्यांच्या अपघाती निधनानंतर शाखाधिकारी विजय ढेरे, बँक सखी आनंदिता घनश्याम प्रभू तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून विम्याची रक्कम वारसदारांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांच्या हस्ते सौ. मयुरी राणे यांना चार लाख रुपयांच्या विमा रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी बँक ऑफ इंडिया आचरा शाखाधिकारी विजय ढेरे, आदित्य कामत, बँक सखी आनंदिता घनश्याम प्रभू, स्टार युनियन दाई-इची इन्शुरन्सचे अधिकारी राजेश खरात, बँक कर्मचारी अनिकेत घाडी, योगेश बागवे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अर्जुन बापर्डेकर यांनी दुःखाच्या प्रसंगी राणे कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी बँक ऑफ इंडिया, आचरा शाखेने दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले. शाखाधिकारी, कर्मचारी आणि बँक सखी आनंदिता प्रभू यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. राणे कुटुंबीयांनीही बँकेच्या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.






